मानवता हाच धर्म

मानवता हाच धर्म

माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला जसं नाव, आडनाव असतं, तसा प्रत्येकाचा एक धर्मही असतो. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन , बौद्ध वगैरे-वगैरे धर्मापैकी आपला कोणता तरी एक धर्म असतो. बहुतेकांना धर्म त्यांच्या जन्मावरून मिळालेला असतो. म्हणजे आईवडिलांचा जो धर्म, तोच मुलांचा धर्म असतो. फारच थोडे लोक स्वत:चा धर्म स्वत:च निवडतात. कुठलाही धर्म म्हटलं, की धर्म संस्थापक, धर्मग्रंथ, धर्मभाषा, दैवतं, देवस्थानं, उपासनापद्धती इत्यादी गोष्टी आल्याच. रूढ अर्थानं पाहता धर्माच्या परंपरेत मानवता धर्माला वेगळं असं स्थान नाही. जगातील बहुतेक राष्ट्रे बहुसंख्य लोकांच्या धर्मावरून ओळखली जातात. राज्य कोणत्याही पक्षाच असो, लोकांच्या मनावर राज्य मात्र धर्माचंच राहत आलेलं आहे. पुरोहित, पोप, मुल्ला, मौलवी हे धर्माचे ठेकेदार होऊन बसले आहेत. हजारो वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या वेद, कुराण, बायबल यांसारख्या धर्मग्रंथांना प्रमाण मानून, धर्माचे हे अडाणी ठेकेदार सामान्यजनांना जगणं मुष्किल करतात. समाजावर स्वत:चे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ते स्वत:ला प्रेषित म्हणून घेतात. धर्म हे ईश्वरनिर्मित आहेत असं सोईस्करपणे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवलंय. धर्मग्रंथात वेळोवेळी आपल्या सोयीच्या गोष्टी घुसडल्या आणि धर्माचा आपल्या सोयीने अर्थ लावला. धर्मग्रंथांचे तंतोतंत पालन केलेच पाहिजे. अशा हेकट वृत्तीने समाजाला नवीन मूल्य स्वीकारण्याची संधी मिळू दिलीच नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या आईबापांना जीव द्यायला भाग पाडणारे तथाकथित विद्वान पंडित हिंदू धर्मातच होऊन गेले. प्रत्यक्ष जन्मदात्याला कैदेत टाकून, सख्ख्या भावांचे मुडदे पाडून, दिल्लीच्या सिंहासनावर आरुढ होणारा आलमगीर औरंगजेब म्हणे धार्मिक होता.

‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज!”

जनरल झिया भुट्टोला फासावर लटकवून पाकिस्तानचं इस्लामीकरण करायला निघाले होते. धर्माच्या नावावर कहर केला तो अमर्याद सत्ता हाती असलेल्या हिटलरनं! लक्षावधी ज्यू धर्मीयांना त्याने यातना तळामध्ये छळून छळून मार मारलं! गॅस चेंबरमधील मुडद्यांची विल्हेवाट लावणं कटकटीच झालं म्हणून त्याने माणुसकीला काळिमा फासणारा असा नीच मार्ग पत्करला. ट्रक भरभरून ज्यू लोक गावाबाहेर दूरवर नेले जात. तिथ त्यांनी त्यांच्यासाठी खड्डे खणून तयार ठेवायचे. आधीच्या मुडद्यांना त्यांच्या खड्यात पुरायचे. त्यानंतर आपापल्या अंगावरील कपडे, बूट, हॅट, मोजे, दागिने असे त्या त्या ढिगांवर टाकायचे आणि शेवटी नग्न होऊन, तोफेसमार अर्धवतुळाकार उभे राहायचे, मरणाची वाट पाहत. यांत एकाच कुटुंबातील मुले, आजी, आजोबा, सुना, नातवंड असायची!

जगात कोणता धर्म मानवाला असे अधम कृत्य करायला सांगता?

आपल्याकडं म्हणजे औरंगाबद, हैदराबाद, भिवंडीतल्या जातीय दंगलीत निरपराध्यांची कत्तल करणाऱ्यांना धार्मिक म्हणायचं का? पंजाबमध्ये हजारों निरपराध्यांना गोळ्या घालून ठार करणाऱ्या शीख अतिरेक्यांना धार्मिक म्हणायचं का? ही धार्मिकता नाही, तर ही आहे धर्मांधता, मित्रांनो, जगातला कोणताच धर्म असं वागायला शिकवत नाही. धम्माची निर्मितीच मुळी मानवाने मानवाच्या भल्यासाठी आणि मानवतेच्या आधारावर केली आहे. ‘धारणात् धर्म’ अर्थात् आपण ज्याचे धारण करतो तो आपला धर्म पक्षाचा धर्म उडण्याचा, माशाचा धर्म पोहण्याचा, तसा मानवाचा धर्म मानवतेचा.

‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे:

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे,

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे!”

सानेगुरुजींनी किती सोप्या शब्दांत सागितले आहे. सत्य, अहिंसा, संयम, दया, प्रेम, परोपकार या धर्मातील शाश्वत तत्त्वांवरच जगातला प्रत्येक धर्म उभा आहे. तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम करता तितकंच इतरांवरही करा. आपल्याला रामदासांनी तरी दुसरं काय सांगितलं आहे? “आपणास चिमटा घेतला, तणे जीव कासावीस झाला. आपणावरूनी दुसऱ्याला ओळखीत जावे!” परमेश्वर हा मंदिर, मशीद, चर्चमध्ये कधीच बंदिस्त नसतो; तर तो घाम गाळून कष्ट करणाऱ्यांच्या घरी भाकरीच्या रुपात आढळतो!

जो श्रमतो अन् प्रार्थितो,

जीवन प्रीतीने उजळी!

निर्भय तो, त्याला कळते,

प्रभू असतो त्याचे जवळी!

पाषाणमूर्तीना दुधा-तुपाने न्हाऊ घालणाऱ्या कर्मठांना खरा धर्म कधीच कळलेला नसतो. तो कळलेला असतो. महाराच्या पोराला कडेवर घेणाऱ्या नाथांना! तो कळलेला असतो विधवांसाठी शाळा काढणाऱ्या महर्षी कर्त्यांना. अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला करणाऱ्या जोतीबा फुल्यांना. हरिजनांना मंदिर प्रवेश मिळवून देणाऱ्या सानेगुरुजींना. महारोग्यांसाठी झिजणाऱ्या बाबा आमटेंना. संत गाडगे महाराज, मदर तेरेसा, डॉक्टर कोटणीस… अशी किती तरी उदाहरणे देता येतील, की ज्यांना खरा धर्म कळलेला आहे.

जय हिंद!

Leave a Reply