मी केलेली सहल

मी केलेली सहल
हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेड़ो रे, जीवनाचे गीत गारे, धुंद व्हारे” आपल्याला नेहमी वाटते की, कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन तेथील सौंदर्य न्याहाळावे. स्थळे बघावीत त्या बद्दलची माहिती गोळा करावी. त्या स्थळाचे महत्त्व काय आहे ? ऐतिहासिक दृष्टया किंवा पौराणिकदृष्टया ज्या स्थळाला विशेष महत्त्व आहे, त्या ठिकाणी एकदा तरी भेट द्यावी. सहल म्हटली म्हणजे कुठेतरी दूर जाऊन तेथील मौज घ्यावी, त्याचबरोबर काही माहिती मिळविण्याच्या दृष्टिकोनातूनही त्याकडे बघावे, त्यासाठी आपण एखादे स्थळ निश्चित करतो आणि मग तेथे सहलीला जातो. मग आपल्या बरोबर अनेक व्यक्ती असतात. शाळेची सहल एखाद्या ठिकाणी जात असेल तर आपले सगळे वर्गमित्र आणि शिक्षकवर्गही आपल्या सोबत सहलीकरिता येतात. मग तर काही वेगळीच मौज असते. असेच एकदा आमच्या शाळेची सहल चिखलदऱ्याला घेऊन जाण्याचे आम्ही ठरवले. स्थळ चांगले आहे असे ऐकले होते. आमचे सगळे मित्र मैत्रिणी सहलीला येण्यासाठी तयार होतेच. आम्ही आमच्या शिक्षकांनाही सहलीला येण्यासाठी आमंत्रित केले. दोन शिक्षक आणि तीस मुले-मुली मिळून सहलीसाठी जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळीच जायचे होते. आठशे ते हजार किलो मीटर अंतराची सहल होती, त्यामुळे स्वतंत्र बस करण्यात आली. सगळ्यांनी आपआपले आवश्यक सामान घेतले. बसचा प्रवास असल्यामुळे आम्ही सगळे आनंदात होतो. मी खिडकीजवळच बसलो होतो. सकाळची थंड हवा माझ्या कानांना स्पर्शन जात होती. बसचा वेग वाढत होता, तसतशी मुलं मौजमस्ती करीत होती. सकाळचा सूर्योदय बघून आनंद झाला. सूर्याची कोवळी किरणं आमच्या अंगावर पडत होती. पक्ष्यांचा किलकिलाट मंद स्वरात कानात गुंजत होता.
“चिखलदरा” लांबचा प्रवास असल्यामुळे परतवाडा आम्हाला रात्रीचा मुक्काम ठोकावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला आम्ही जाणार होतो. त्यामुळे यहा फराळ आटोपल्या नंतर आम्हाला एका जवळच्या मार्गदर्शकाने परतवाडयातील स्थळाचे महत्त्व सांगितले. ते ऐकून तर सगळेच आश्चर्याने चकित झाले. पहाडी क्षेत्र असल्यामुळे धुके बरेच पडले होते. सकाळीपण जवळची व्यक्ती दिसत नव्हती.
विस्तीर्ण डोंगर क्षेत्र, सातपुड्याच्या रांगा स्मित करून आमचे जणू स्वागतच करीत होत्या. झाडे-वेली फुलं सकाळच्या प्रसन्न हवेत अधिकच विस्तीर्ण वाटत होत्या. उंच उंच डोंगरावरून नागमोडी वळणाची पायवाट दिसत होती. अजून तर चिखलदरा गाठायचा आहे मग तिथले निसर्ग वैभव कसे असणार ? विलक्षण कल्पना डोक्यात घर करून जात होती. “सु सु SS” असा मंद आवाज डोंगरातून कानापर्यंत येत होता. दूरपर्यंत दृष्टी टाकल्यास डोंगराच्या मध्यामध्यातून कुठेतरी पाण्याची धार येताना दिसत होती. मला तर असे वाटत होते “वा किती सुरेख दृश्य, निसर्गाची किमया आहे सारी।” तेवढ्यात कुणी तरी शीळ वाजवली, त्याचेबरोबर सगळी मुले बस जवळ धावत गेली. मी पण बसकडे धावतच गेलो.
‘बस’ सुरू झाली होती नागमोडी चढावउताऱ्याच्या रस्त्याने पुढे धावत होती. खिडकीतून सगळी मुलं दऱ्या-खोऱ्या, झाडे झुडुपं निरखून पाहत होती. ज्या ज्या स्थळांना भेट दिली. तेथील माहिती आम्ही टिपून घेतली. आता आमचा प्रवास चिखलदऱ्याकडे सुरू झाला होता. चिखलदऱ्यात पोहोचायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. बस थांबताच सगळे आपले सामान घेऊन रेस्टहाऊसकडे वळले. आता तर सर्वकाही विस्ताराने बघायचं होतं. या स्थळाची माहिती नसल्यामुळे आम्ही एका मुलाला गाईड म्हणून सोबत घेतले त्याने आम्हाला एकेका स्थळाची माहिती सांगितली. ती सर्व आम्ही आपल्या वहीत टिपून घेतली. उंचचउंच पहाडी क्षेत्र असल्याने धूके जास्तच पडत होते. दुपारी तीनची वेळ होती, परंतु सूर्य अस्ताला गेल्यासारखा वाटत होता चार पाच जागेचे महत्त्व आम्हाला सांगण्यात आले.”भीमकुंड पॉईंट” म्हणून एका स्थळाला अत्यंत महत्त्व आहे. पौराणिक कथेचा येथे उगम झाला आहे. म्हणतात की, “भीमाने किचकवध केल्यानंतर याच ठिकाणी स्वतःच्या रक्ताने माखलेले हात धुतले” या जागेचा व्याप खूप मोठा आहे. खोलचखोल दरी आणि चारी बाजूंनी पहाड कुंडाच्या आकारासारखे! जवळच दगडी मंदिर आहे. जाण्यासाठी निमुळती वाट आहे.
हे सगळे दृश्य पाहून मनाला अतिशय आनंद होत होता. वाटत होते या निसर्गातच राहावे, खऱ्या सजीवसृष्टीचा आस्वाद घ्यावा असे वाटत होते. ऐतिहासिक किल्ले आणि स्थळे पाहताना संशोधनाची आवड मनात जागृत होते, माहिती मिळविण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व सिद्ध करता येते, तसेच निसर्ग दृश्यांचाही आस्वाद घेता येतो..
आमची सहल चिखलदऱ्यातच संपली होती. पुढे कुठेही जायचे नव्हते. घरीच परतायचे होते. असे वाटत होते, घरी जाऊच नये येथेच राहावे. सगळे आनंदाने घरी परतले. परतीचा प्रवास फारच चांगला झाला होता. प्रेक्षणीय स्थळांनी मनात घर केले होते.

Leave a Reply