खेळाचा रंगलेला सामना

खेळाचा रंगलेला सामना
“आ देखे जरा किस में कितना है दम,
जम के रखना कदम मेरे साथियों”
कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट हे सर्व मैदानी खेळ मला खूप आवडतात. कोणता खेळ जास्त आवडतो असे विचारले तर कधीही माझे उत्तर राहील क्रिकेट. या खेळाने माझ्यावर खूप लहानपणापासून एक प्रकारची मोहिनीच घातली आहे. मी वयाच्या सातव्या वर्षांपासून क्रिकेटचा सराव करू लागलो. सुरुवातीला माझ्या क्रिकेटच्या वेडापायी आईबाबा त्रासून जायचे. टी. व्ही. वर मॅच असली की मी नीट जेवायचो नाही. अभ्यास नाही. शाळा नाही. अगदी टी.व्ही. पासून हटत नव्हतो. शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनी माझी या खेळातली प्रशंसनीय कामगिरी आईबाबांना सांगितली, तेव्हा कुठे त्यांनी ठरवलं की, याला याच्या आवडीच्या क्षेत्रातच तरबेज करायचे.
लगेच आईबाबांनी माझ्यासाठी एक खास प्रशिक्षक नेमला. सकाळी पाचपासून माझा सराव आठपर्यंत सुरू असायचा. जोडीला शाळा आणि अभ्यास होताच. माझे मार्गदर्शक खूपच चांगले होते. बॅट कशी धरायची, उभं कसं राहयचं, बॅटिंग करताना पूर्ण मैदानात सर्वखेळाडूवर कसं लक्ष ठेवायचं, बॉल कसा पकडायचा इथपासून बारीक सारीक गोष्टींबाबतही मार्गदर्शन केले.
मार्गदर्शकाच्या आणि माझ्या खेळाच्या परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. आमच्या शाळेचा सामना न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेशी ठरला होता. आम्ही सारे गडी मैदानात जमलो. दोन्ही चमूंचा परिचय करून घेण्यात आला. नाणेफेक आम्ही जिंकली; त्यामुळे अर्धा सामना आम्ही जिंकलाच असे आम्हाला वाटले.
आम्ही गोलंदाजी स्वीकारली. विरुद्ध चमूच्या धावा होऊ नये म्हणून आम्ही चोखपणे क्षेत्ररक्षण करीत होतो. चेंडूही असे टाकले जात होते. की, त्यांना चौकार ठोकता येत नव्हता. षट्कार तर दूरच राहिला. कशाबशा त्यांनी ११० धावा काढल्या. आमच्यासाठी ११० धावा म्हणजे हातचा मळ होता. आमचा खेळ सुरू झाला. दुसऱ्याच चेंडूवर आमचा कर्णधार पायचित झाला. आमच्या काळजाचा ठोका चुकला. दुसरा गडी आला त्याने धावसंख्या २५ पर्यंत नेली व तोही बाद झाला होता. त्याचा त्रिफळा उडाला होता. एकापाठोपाठ एक गडी आऊट होत होते. अपयशाची काळी छाया .आमच्या चमूवर दिसू लागली. १० चेंडूत २५ धावा हे लक्ष्य आम्हाला गाठायचे होते. आता मैदानात सर्व तयारीनिशी मी उतरलो होतो. मनातल्या मनात देवाचे, आईवडिलांचे आशीर्वाद आठवून हातात बॅट घेतली.
पहिल्याच चेंडूवर षट्कार हाणला. मग मात्र मला हिमंत आली. एका चेंडूवर सहा धावा काढायच्या होत्या, नाहीतर पराजय होणार होता. मी सर्व ताकदीनिशी बॅट फिरवली. चेंडू उंच आकाशात उडाला व थेट मैदानाच्या बाहेरच त्याचा टप्पा पडला. माझ्यामुळे हा सामना आम्ही जिंकलो होतो. शेवटच्या चेंडूवर सर्व प्रेक्षक अगदी श्वास रोखून पाहत होते. सर्वांनी विजयोत्सव साजरा केला. मैदानात माझे मार्गदर्शक धावत आले. त्यांनी मला वर उचलून घेतले. त्यांच्या आणि माझ्या परिश्रमाचे सोने झाले होते. आईबाबा आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे घेऊन माझे कौतुक करायला आले. मुख्याध्यापकांना माझा खूप अभिमान वाटला. मी त्यानंतर खूप सामने खेळलो विजयी झालो. पण तो पहिलावहिला अविस्मरणीय सामना मी कधीच विसरू शकणार नाही.

Leave a Reply