पहिला पाऊस

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे आपण म्हणत असलो, तरी नित्यनेमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्यापूर्वी ग्रीष्माच्या भव्य कढईत आपल्या देहाची अगदी लाही लाही उडालेली असते. म्हणून ‘पहिला पाऊस’ हा हवाहवासा असणारा पाहुणा ठरतो कारण उकाड्याने जीव नकोसा व्हायचा. घरात बसूनसुध्दा चैन पडत नव्हते. पाखरे झाडांच्या फांद्यांवरून बसलेली होती. दूरवर खिडकीतून माळ दिसत होता. रणरणते ऊन त्याला भाजून काढीत होते. गुरे झाडाखाली विसावली होती.
सारे कसे शांत वाटत होते; पण सुतकी वातावरण वाटत होते. तेवढ्यात अचानक एक झुळूक आली ती कुठून तरी पाण्यावर लोळून आली होती. तो ओला स्पर्श अंगाला असा काही सुखकर वाटला । झाडांची सुध्दा मरगळ नाहीशी झाली. तीही थोडी शहारली. पाखरांनी पंख फडफडविले गाई-गुरे उभी राहिली. वारा सुटला. धूळ उडाली. धुळीचा उंचच उंच स्तंभ दिसू लागला. वाळकी पाने, काड्या-काटक्या घरात येऊन पडल्या. दारे-खिडक्या धडाधड आपटू लागली. आकाशात काळे ढग उंच-उंच चढू लागले. ढगांची गंभीर गर्जना ऐकू येऊलागली. ऊन केव्हा नाहीसे झाले ते कळलेच नाही चांगलेच अंधारून आले. संध्याकाळ झाल्यासारखे वाटले. विजांचा कडकडाट होऊ लागला.
थोड्याच वेळात विजांनी आपला चमकारा वाढवला. चाबकासारख्या लांबच लांब विजा दिसू लागल्या. त्या डोळे दिपवीत होत्या. डोळे दिपवणारी वीज चमकली की काही वेळाने गडगडाट ऐकू येई. त्यांची गंभीरता वाढली काही वेळा तर कडकडाट एवढा भयंकर होई की मोठी माणसेसुध्दा भेदरून जाऊ लागली. काही लहान मुलांनी आईच्या कुशीत आपली तोंडे लपवली. टपोरे थेंब पडू लागले. टप टप टप • काही क्षणांतच त्यांचा वेग वाटला. पत्र्याचा ताशा वाजू लागला. रस्त्यावर थेंबांचा नाच दिसू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहू लागले झाडाखाली बसलेली गुरे माना खाली वाकवून शिंगांवर पाऊस झेलीत जाऊ लागली. चिमण्या, कबुतरेही आपल्या पंखांवर पाऊस झेलीत होती. उकाड्याने तापलेल्या अंगाला वर्षा निववीत होती.
छोटी-छोटी मुलेही अंगणात धावली. उघड्या अंगाने नाचू लागली. उन्हाने तापलेल्या अंगावर तो गार शिडकावा मोठा आनंददायक वाटत होता. ती बेहोष नाचत होती. आजी-आजोबांनी चौघड्या लपेटून घेतल्या. ‘अरे घरात व्हा घरात या आजारी पडायचं का म्हणून ती ओरडू लागली. पण मुलांच्या कानात त्यांचे शब्द जात नव्हते. तार सप्तकात ओरडत होती ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. या वेळेस पावसानेसुध्दा त्यांचे ऐकायचे ठरविले होते.
या पहिल्या पावसाने लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही समाधान पावतात तृषार्त धरतीमाताही या पहिल्या पावसाने तृप्त होते, निवते आणि तिच्या समाधानाचा परिमल सर्वत्र दरवळतो. त्या मृद्गंधानेच तृप्त होऊन मानव पहिल्या पावसाचे पूजन, स्वागत करत असावा असे मला वाटते.

Leave a Reply