शालेय जीवनातील गमती जमती

आपल्या जीवनात अनेक अविस्मरणीय प्रसंग आठवणी असतात. शालेय जीवन माणूस कितीही मोठी झाली तरीही विसरू शकत नाही. तो वयाने, मानाने अधिकाराने मोठा झाला तरी त्यांच्या अंतःकरणात शालेय जीवनाच्या आठवणींचा एक कप्पा सुरक्षित असतो.
शालेय जीवनातली ती वर्षे आठवतात. पहिल्या तासापासून सतत पाचव्या तासापर्यंत शिक्षणप्रक्रिया अखंडितपणे सुरू असते; पण जिवावर येतो तो सहावा, सातवा आणि आठवा तास अभ्यास, डोकं भंडावून गेलेलं असतं. त्या पुस्तक, वह्यांचा अक्षरश: कंटाळा येतो शिक्षकांचे चैतन्यहीन शिकविणे नकोसे होते. मग कुणाला तरी खोकला येतो. ती खोकल्याची साथ पूर्ण वर्गात पसरते. तर कधीकधी एकजात सर्वांनीच त्या विषयाची पुस्तके आणली नसतात. सामूहिक शिक्षा वैयक्तिक शिक्षेपेक्षा आनंदाने स्वीकारली जाते. पूर्ण वर्ग वर्गाबाहेर दोन, तीन शहाणे फितूर झालेले तेवढे वर्गात आणि शिकविणारे शिक्षक आम्ही बाहेर खूप मज्जा करतो. शिक्षकांच्या नकलांपासून तर मुख्याध्यापकांच्यानकलापर्यंत ! ती शिक्षा संपू नये असे वाटते; पण बेल होते आणि आम्ही विजयी झालेल्या थाटात वर्गात प्रवेशतो.
ही गंमत सर्वांनी अनुभवलेली असते. शिक्षेतला आगळा-वेगळा आनंद बरोबर लक्षात राहतो. ही गंमत म्हणजे शालेय जीवनातल्या रखरखीपणातला पहिला पाऊस असतो. शालेय वय म्हणजे हसण्याखेळण्याचे, हुंदडण्याचे शेतात रानात जाऊन भटकायचे, पाण्यात डुंबायचे वय, पण याच वयात अभ्यासाची कटकट सुरू होते व यावर उपाय म्हणून विनोदाचे शस्त्र आम्ही विद्यार्थी हातात घेतो. ‘सामर्थ्य आहे गमतीचे जो जो करील तयाचे’
हे सामर्थ्य जाणून आम्ही त्या सामर्थ्याचा आविष्कार घडवितो. ‘टवाळा आवडे विनोद’ असे रामदासांनी म्हटले आहे, आम्ही सगळेच टवाळखोर होतो, त्याशिवाय शालेय जीवनात जिवंतपणा येईल कसा ? शाळेत आल्याबरोबर कोणकोणते शिक्षक आज आले नाहीत याची नोंद घेतो. आपल्याला शिकविणारे शिक्षक रजेवर आहेत म्हटले की कोण आनंद! या ऑफ तासात मागच्या बेंचवरचे विद्यार्थी पूर्ण वर्गाला आपल्या ताब्यात घेतात. त्यांना सर्व शिक्षकांचे सर्व विषय, त्यांच्या सवयी, त्यांचे बोलणे येत असते. ते या विषयात पारंगत असतात मग काय यात वर्गातला प्रत्येक मुलगा सक्रिय सहभागी असतो. हा ऑफ पिरियड म्हणजे शिक्षा होण्यापूर्वीचा पिरियड असतो हे सर्वांना माहीत असते.
याशिवाय सहल आणि गॅदरिंग स्नेहसंमेलन यावेळच्या गमतीजमतीही अविस्मरणीय असतात. नाटकाची प्रॅक्टीस धांगडधिंगा, गप्पा-गोष्टी, खेळगाणी या सर्वांनी शालेय जीवनात खरी लज्जत आणली आहे, म्हणूनच हे शालेय जीवन आपण कधीच विसरू शकत नाही. विसरणार नाही.

Leave a Reply