माझा गाव

“गोदामाईच्या कुशीत वसले माझे गाव माणुसकीच्या ओलाव्यात भिजले माझे गाव कुणा एका महान कवीने माझ्या गोदेच्या काठच्या या छोटयाशा खेड्याचं वर्णन करून माझ्या खेड्याच्या सौंदर्याची पावती दिली. माझ्या खेड्याचं नाव सुंदरखेड नावाप्रमाणे सुंदर असणार हे खेड. हिरव्या मळ्यांनी आणि सोन्यासारख्या डोलणाऱ्या पिकांनी सर्वांनाच आकर्षित करते गोदामाईचा वरदहस्त माझ्या खेड्याला लाभल्याने आम्हा गावकरी लोकांना सुखासमाधानाने जीवन जगता येतं.
शहरी संस्कृतीपासून खूप लांब असलेला पण माणुसकीच्या ओलाव्यानं ओलंचिंब झालेलं गाव. वात्सल्याच्या जलधारांनी सतत शूर्चीभूत झालेलं असतं हे गाव म्हणजे निसर्गसौंदर्याचा आविष्कार, परमेश्वराच्या कृपेचा साक्षात्कार आहे. या गावात माणूस ही एकच जात ‘माणुसकी’ हा एकच धर्म पाळला जातो. निसर्गाशी इमान राखावं हे या गावकऱ्यांच्या जीवनातले महत्वाचे सूत्र परिश्रमातून त्यांनी सोनं पिकवलं आहे. छोटसं गाव पण स्वावलंबी आहे. सौदर्याच्या किरीटात पुखराज चमकावा तशी गोदामाई आमच्या गावाच्या वस्तीला कायम आहे.
माझ्या गावाचं विलोभनीय दृश्य साकार करण्यासाठी या काव्यपंक्ती पुरेशा आहेत. जुनी संस्कृती, जुन्या प्रथा परंपरा जोपासणारा हा गावकरी अंधश्रद्धा जोपासणारा आहे. पण आपल्या हातून कोणाचे वाईट होऊ नये हा आदर्शवाद त्याच्या जीवनात प्रत्ययाला आलेला दिसतो. पाटिलकी, न गाजविणारा पाटील सर्व गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. यांनीच गावात वीज आणली. शाळा सुरू केली. उनाडपणे हुंदडणारी मुलं शाळेत दोन चार बुकं शिकू लागली स्वच्छतेचा पाठ घराघरात शिकविला जातो. प्रत्येक घर म्हणजे एक संस्कारकेन्द्र आहे झाडांना हात लावू नका, झाडे तोडू नका, अशाप्रकारच्या पाट्या लावण्याची आवश्यकता कधी भासली नाही.निसर्गावर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणारे हे भाबडे गावकरी मोठे भाविक आहेत. गावातील मंदिरात रात्रीच्या वेळी कीर्तन, प्रवचनातून प्रबोधन साधले जाते. पुजारी नसूनही मंदिरातले पावित्र्य राखले जाते. प्रत्येकाच्या अंतःकरणाचा गाभारा शुचिता, पावित्र्य, संस्कार यांनी उजळला आहे. जत्रा उत्सव यांच्या माध्यमातून कलागुणांना वाव दिला जातो. खऱ्या अर्थाने गावकरी जीवनाचा आस्वाद इथेच घेतात. साखरेतला गोडवा गावकऱ्यांच्या वागण्यात अनुभवता येतो.
निसर्गाने दिलखुलासपणे आपले भांडार या गावासाठी खुले करून दिले आहे. यंत्राच्या सान्निध्यात राहणारा यंत्रवत माणूस तुम्हाला शोधूनही इथे सापडणार नाही. “गोदेतला हा माझा गाव माझी खेड्याकडे धाव त्याच्या ठायी माझा भाव खेड्यातच माझ्या पुन्हा पुन्हा जावं”

Leave a Reply