कंटाळा आला या परीक्षांचा!

अरे परीक्षा, परीक्षा जिवा, वाटतसे शिक्षा परीक्षांनी उत्तरविला सान्या आनंदाचा नक्षा
परीक्षा परीक्षा परीक्षा कंटाळा आला परीक्षांचा शाळेत प्रवेश मिळविण्यापासून जीवनाच्या अंतापर्यंत फक्त परीक्षाच आहेत. जीवन म्हणजे एक सत्त्वपरीक्षाच सध्या आम्ही विद्यार्थी जीवनातील परीक्षांचा छळ सहन करीत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्यानंतर शाळा सुरू होते. सर्व मित्र, नवीन वर्ग, नवीन शिक्षण यांच्या आनंदात दिवस कसे पटकन जातात आणि एक दिवस घटक चाचणीची सूचना येऊन धडकते. आमच्या आनंदावर विरजण पडते.
घटक चाचणीच्या तयारीला लागतो. परीक्षा होते, निकाल लागतो की लगेच दुसरी घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा इथे परीक्षांचा प्रवाह थोडा शिथिल होतो. दिवाळीच्या सुट्या लागतात; परीक्षांच्या जाचातून आमची सुटका होते; पण याही दिवसात अभ्यासाची कटकट सुटली नसते. भरमसाठ अभ्यास दिला जातो. तो पण पूर्ण होत नाही तर सुट्या संपतात व पुन्हा तृतीय, चतुर्थ, घटक चाचण्या द्वितीय सत्र या परीक्षा एकामागे एक येऊन आमच्या सहनशीलतेचा जणू अंतच पाहात असतात.
परीक्षापद्धतीमुळे आमच्या ज्ञानाचे, बुद्धीचे अभ्यासाचे मूल्यमापन होते असेही नाही. एका तासाच्या घटकचाचणीतून खरोखर तो घटक समजला आहे किंवा नाही याची परीक्षा होत नाही. ऐन परीक्षेच्या वेळी एखादा हुशार विद्यार्थी आजारी पडला, तर तो अनुत्तीर्ण घोषित केला जातो. याउलट एखादा विद्यार्थी मात्र कॉपी करून उत्तीर्ण होतो किंवा पेपर परीक्षकांकडे जाऊन सोडविणे हे मूल्यमापन कितपत योग्य वाटते.आजची परीक्षा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवू शकत नाही. नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शारीरिक प्रगती या परीक्षा करू शकत नाहीत. आदर्श नागरिक घडविण्याची क्षमता या परीक्षापद्धतीत निश्चितच नाही. सौंदर्यदृष्टी, रसिकता कर्तृत्व, कल्पनाशक्ती या गुणांना परीक्षा पद्धतीत वाव नाही. परीक्षापद्धतीत महत्त्वाचा दोष म्हणजे या परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला व्यवसाय मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. यामुळेच परीक्षांवरील विश्वास उडत चालला आहे.
परीक्षांचा कंटाळा आला तरी विचार केल्यावर त्या परीक्षा पूर्णपणे काढून टाकणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे याची खात्री पटते. या परीक्षापद्धतीत सुधारणा आणणे मात्र आवश्यक वाटते. मूल्यमापनातील व्यक्तिनिष्ठता काढून टाकता आली पाहिजे. तीन तासांच्या परीक्षेवर एखादयाचे व्यक्तिमत्त्व ठरविणे अयोग्य आहे. असे जुजबी दोष काढल्यास परीक्षापद्धतीत सुधारणा होईल. परीक्षार्थी तयार करण्यापेक्षा ज्ञानार्थी तयार व्हावा, हे ध्येय समोर ठेवून परीक्षांचा विचार केल्यास ‘कंटाळा आला या परीक्षांचा’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही.

Leave a Reply