वाचनाचे वेड

वाचनाचे वेड किंवा ‘वाचाल तर वाचाल’
मला अजूनही माझ्या दादाने मी लहान असताना त्याच्या पुस्तकातील एका लेखकाची वाचनाच्या वेडामुळे झालेली गंमत सांगितलेली आठवते. त्या वेळेस त्याने ती गोष्टी एवढी विनोदी पद्धतीने सांगितली होती की, मी पोट धरून हसले होते, पण मला आता त्या वाचनातील बेहाचे मर्म उमगले. वास्तविक पाहता प्रत्येकाचा पुस्तके वाचण्याचा हेतू वेगवेगळा असतो. काही माणसे वेळ घालविण्यासाठी वाचतात काही लवकर झोप येण्यासाठी वाचतात, तर काही खरोखरच ज्ञान संपादन करण्यासाठी वाचतात तर काही मनाला विरंगुळा मिळावा म्हणून वाचतात. आपण आज एकविसाव्या शतकाच्या उंबठ्यावर विराजमाने झालो आहोत. परंतु इतर प्रगत देशांच्या तुलनेत आपण खुपच प्रगत आहोत कारण आपल्याकडील लोकांना वाचनाची आवड जर लहानपणीच निर्माण झालो तर त्याचे व्यसन केव्हा बनेल हे सांगता येणार नाही,
खरं पाहिले तर मला माझ्या लहानपणी वाचनाचे जेवढे संस्कार व्हायला हवे होते तेवढे झाले नाही. परंतु मी जेव्हा पाचवीत होते तेव्हा माझ्या भावाजवळचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे बाळ कोल्हटकरांचे नाटक मी वाचले. पण खरच त्या वयातही मला ते पुस्तक एवढे आवडेल की मी परत परत ते पुस्तक वाचत होते त्यातील ताईने मला भारावून टाकले होते. आणि मग तेव्हापासून मी कोणतेही पुस्तक दिसलं की वाचत बसायची, मग ते हिंदी असो, मराठी असो किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे पान असो. त्यात काही चांगलं वाचायला मिळतं का हे मी पाहत असो. आणि तेव्हापासून मला जणू वाचनाचे जणू वेडचं लागलं. मग वि. स. खांडेकरांच्या जीवनवादी दृष्टीकोनाने, ना. सी. फडके यांच्या मनोरंजन लेखनाने वा.म. जोशी यांच्यातील तात्त्विक बैठकीमुळे माझे मन अगदी भारावून गेले तर अत्र्यांनी उधळलेल्या ‘झेंडूची फुले’ बेचता बेचता मी पोट धरून हसले आणि श्री. म. माटे यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग’उलगडून दाखविल्याने मन गलबलून गेले. आनंद यादवांच्या ‘झोंबी’ ने जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान शिकविले, असे कितीतरी लेखक आणि त्यांच्या साहित्यकृती वाचण्यात आल्या. प्रत्येक लेखकाचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आगळे वेगळे वाटले.
खरोखर वाचनामुळे माणूस आपले ज्ञान अद्ययावत ठेवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने पूर्वी कितीही पदव्या संपादन केलेल्या असल्या आणि नंतर त्याने वाचन पूर्णपणे थांबवले तर निश्चितच त्याच्या बुद्धिला गंज चढल्याशिवाय राहणार नाही. भूतकाळाशी वर्तमानकाळाची सांगड घालण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये असते. पण त्यासाठी हे ग्रंथ वाचणे अत्यंत आवश्यक असत. जगाच्या विविध भागातील संशोधकांची चरित्रे आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की ही माणसे जाती, धर्म, भाषा, चालिरिती, या सर्व बाबतीत भिन्न होती म्हणजेच त्यांची संस्कृती वेगळी होती, परंतु सगळ्यांमधील एक सवय समान होती ती म्हणजे वाचन. या वाचनामुळेच आपलेव्यक्तिमत्त्व घडत असते. ज्यांचे वाचन अफाट त्यांचे वक्तृत्वही अफाट असते. शद्वांचा तुटवडा त्यांना कधीच पडत नाही. वाचनामुळेच माणूस चिंतनशील बनतो, विचारी बनतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या अंगी निर्माण होते म्हणूनचं माणसांनी नेहमी ग्रंथ वाचावेत रामायण, भगवद्गीता यात जीवनाचे तत्त्वज्ञान दडलेले आहे. त्यांचा आस्वाद आपण घ्यायला पाहिजे. ग्रंथ वाचल्यामुळे आपल्यात समग्र दृष्टिकोन प्राप्त होतो. या ग्रंथरूपी ‘गुरुकिल्ली’ लपवून ठेवत नाही किंवा गुरुदक्षिणेचीही अपेक्षा करत नाही. असा हा आला गुरु, मार्गदर्शक ग्रंथ जीवनाची वाट चुकलेल्यांना जीवनात वाटाड्याचे काम करतात. ग्रंथ आपल्यावर स्वर्गीय आनंदाची जणू बरसातच करतात त्यामुळे अशा ग्रंथ वाचनाचे वेड हे आपल्याला असायलाच पाहिजे. इतर कुठल्याही छंदापेक्षा वेडापेक्षा हे वेड निश्चिच फलदायी आहे म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते.

Leave a Reply