मातृभूमीचे ऋण

मातृभूमीचे ऋण “जहाँ डालडालपर सोने की, चिडियाँ करती है बसेरा, वो भारत देश है मेरा”
‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गिरियसी’ असे म्हणून जननी आणि जन्मभूमी यांचे अनन्यसाधारण महत्त्व व्यक्त केले जाते. या मातांनी आपल्या सुपुत्रांवर एवढे प्रेम केले आहे की त्यांच्या प्रेमाची परतफेड करणे अशक्य आहे. भूमाता, जिच्या अंगावर आपण खेळतो, बागडतो. लहानाचे मोठे होतो. अन्नधान्य, फळफळावळ हिनेच आपल्यासाठी निर्माण केले आहेत.
भारतमाता इंग्रजांच्या गुलामगिरीत होती, तेव्हा अनेकांनी आपले पंचप्राण तिच्यावरून ओवाळून टाकले. तिच्या प्रेमाखातर हसत हसत फासावर चढले, काहींनी तुरूंगवास भोगला, स्वातंत्र्याच्या होमकुंडात अशा अनेक समीधा अर्पण केल्या गेल्या. आज आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र उमेदवार म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवत आहोत; पण मातृभूमीचे ऋण फेडले पाहिजे, ही जाणीव आमच्या मनात पुसट होत चालली आहे.
आमचा भारत खरोखर महान आहे. विविध भाषा, धर्म, पेहराव, व्यवसाय एका तिरंग्याच्या छत्रछायेखाली आनंदाने राहत आहे. ‘ही आमुची भारतमाता, जय जवान, जय किसान’ हे जयगान आम्ही तिच्याविषयीच्या प्रेमाच्या, ओलाव्याने अगदी अंत करणापासून गातो,पण फक्त २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी. एरवी आम्हाला आकर्षण वाटते ते परदेशाचे. आमच्या मनात भारताविषयी अस्मिता जागृत झाली. हा ‘माझा देश’ म्हणताना आपलेपणाची भावना नसेल तर काय उपयोग, मातृभूमीचे ऋण पैसे देऊन फिटणारे नाही. ते फेडायचे असेल तर देशाच्या समस्या दूर करण्यासाठी हातभार लावावा. आर्थिक, सामाजिक राजकीय समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण करण्यासारखे आहे. अराजकता, दुहीची भावना, भ्रष्टाचारी वृत्ती, धर्माधर्मभेद या गोष्टींना नको तितके महत्त्व दिल्या गेल्याने माणूसकी हरवू लागली आहे. हे सारे आपल्याला थांबवता आले तरच ‘मातृभूमी’ चे ऋण फेडल्याचे समाधान आप लाभेल.
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या प्रतिज्ञेचा खरा अर्थ आपल्याला समजला व त्यानुसार आपले आचरण असल्यास आपण ‘मातृभूमी’ चा उद्धार करू शकू व तिच्या ऋणातून थोड्या प्रमाणात का होईना मुक्त झालो असे मानता येईल.

Leave a Reply