माझा आवडता ऋतू

श्रावण “श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा” ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पड़े
बालकवींनी श्रावणाचे गीत लिहून श्रावणमास हुबेहूब चित्रित केला आहे. हिरवी सृष्टी, हिरवी वनराई आणि हिरवी मने याचा जणू त्रिवेणीसंगमच या कवितेत प्रत्ययास येतो. श्रावणाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘श्रावणातला पाऊस’, ऊनपावसाचे पक्षी एकाच वेळी आकाशात उडताना दिसतात. इंद्रधनुष्याचे सात रंग मनाला मोहून टाकतात. आकाशात ढगांची गर्दी झालेली असते. प्रत्येक ढंग जणू आपले वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो.
निसर्गाच्या आविष्काराचा परिणाम पशुपक्षी, मानवसृष्टी यांच्यावरही झालेला असतो. इवली, इवली पाखरे पावसाच्या पाण्यांचा आस्वाद घेताना दिसतात. रंगीबेरंगी फुलपाखरे, रंगीबेरंगी फुलांवर जाऊन बसतात, तेव्हा तर या जादूगार विधात्याचे खूप कौतुक वाटते. हे कौतुक आपण अनेक सणांच्या माध्यमातून करून निर्सगाच्या ऋणात आपण आहोत याची पावतीच देत असतो. मंदिरामंदिरातून भजन, कीर्तन, प्रवचनाचे नाद घुमत असतात. मंदिरातील घंटांचा मंजुळ किणकिणाट वातावरणात पावित्र्य निर्माण करतो.
श्रावणी सोमवार, नवविवाहितेच्या मंगळागौरीचा सण, राखी पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी पोळा असे अनेक सण याच महिन्यात येतात नागपंचमी आणि पोळा म्हणजे नाग आणि बैल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. रक्षाबंधन म्हणजे भावाला बहिणीविषयीच्या कर्तव्याची आठवण करून देणारा सण. मंगळागौरीला. अनेक पत्री आणि फुलं तोडण्याच्या निमित्याने आपण निर्सगाच्या सान्निध्यात जातो, म्हणजे तो आपल्या जीवनात निर्सगाचे महत्त्व सांगण्याचा सण आणि श्रावणी सोमवार म्हणजे तर सर्व देवांत महान अशा महादेवाचे पूजन करण्याचा दिवस. या सर्व सणांचे धार्मिक महत्व श्रावण महिन्यात प्रकर्षाने जाणवते.
मुंबई आणि सागरी किनाऱ्याजवळ तर अनेक लोकांना व्यवसाय मिळवून देणारा सागर देवते समान वाटतो; म्हणून ते राखी पौर्णिमेला सागराची पूजा करतात, सागराला सोन्याचे, चांदीचे, मोत्याचे, ऐपत नसल्यास झाडाचे नारळ अर्पण करतात व असेच आमचे रक्षण कर म्हणून त्याचा धावा करतात म्हणूनच या सणाला ‘नारळी पौर्णिमा’ म्हणतात.
‘श्रावणमासी हर्ष मानसी’ यातला तथ्यांश आपल्याला जाणवतो. निसर्ग, मानव, पशू, पक्षी, फुलपाखरे या सर्वांच्याच जीवनात आल्हाद आनंद आणणारा आवडता श्रावण माझ्याही आवडीचा नसला तर नवल!

Leave a Reply