मला आवडलेले पुस्तक

‘पुस्तकांसारखा परममित्र दुसरा कोणी नाही,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. या वाक्याची सत्यता मला आताशी पटू लागली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत मी एका वाचनालयाचे सदस्यत्व घेतले. अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. ‘श्यामची आई’ या पुस्तकाने माझे मन जिंकले. साने गुरुजीनी वर्णन केलेली ‘आई’ वाचताना नकळत कितीदा तरी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. पुस्तकातला ‘श्याम’ मीच आहे, असे वाटू लागायचे.
आईने श्यामला कसे घडविले याचे वर्णन करणारे ते पुस्तक मी कितीतरी वेळा वाचले आणि त्या पुस्तकाचा परिणाम नकळत माझ्या जीवनावर झाला. आईला दैवत मानण्याइतके शहाणपण माझ्यात आले आहे. तडजोड करण्याची वृत्ती माझ्यात नव्हती. गरिबीविषयी माझ्या मनात चीड होती. मी माझा त्रागा व्यक्त करायचो, पण आता तक्रार न करता, समजुतीच्या चार गोष्टी लहान भावाला सांगण्याचे शहाणपण माझ्यात आले आहे. हा सारा ‘श्यामच्या आई’चाच परिणाम!
या पुस्तकातला एकेक प्रसंग, आणि एकेक वाक्य मानवावर सुसंस्कार करणारे आहे. ‘अरे श्याम पायाला घाण लागली तर इतका जपतो. त्यापेक्षा मनाला घाण लागू नये म्हणून जप.’ यांसारखी अनेक वाक्ये म्हणजे मानवी जीवनाला दिशा दाखविणारे दीपस्तंभ आहेत. साने गुरुजींच्या बालपणापासून एकेक प्रसंग वर्णन करीत करीत त्यांच्या मनात देशभक्तीचे बीज कसे रोवल्या गेले, आई वारल्यानंतर श्यामच्या जीवनात कशी पोकळी निर्माण झाली, स्वतःला सावरत भारतमातेची सेवा करण्याची प्रेरणा कशी मिळाली, या सर्व घटना आजही जिवंत वाटतात.

Leave a Reply