निसर्ग : एक महान गुरु

घन पिता मम जो नटवी धरा. मम असे जननी गिरी-कन्दरा जननिचे शरिरी बहु नाचतो, खदखदा हसतो आणि खेळतो निसर्गातला एक छोटासा घटक म्हणजे झरा जो या धरणीला नटवतो, नाचतो आणि आल्हाददायक वातावरण निर्माण करतो. बालवयातला झरा एवढे सारे इतरांना देतो. मग मानवाने त्याला गुरू केल्यास मानवाचे जीवन आनंदाने उजळून निघेल त्यात शंका नको.
वृक्ष आपले मित्र आहेत वृक्षाशिवाय आपण जगूच शकणार नाही वृक्षांनी आपल्यावर केलेले उपकार विसरणे म्हणजे मानवजातीच्या संहाराला निमंत्रण देणे होय आपल्यावर उपकार करणारा वृक्ष मात्र कितीही फळभारांनी झुकला तर अहंकाराचा स्पर्श होऊ देत नाही. निसर्गाकडून विनयशीलता शिकायची असते. आजारावर उपाय असो, सौंदर्यनिर्मिती असो की प्रदूषणाची, पर्यावरणाची समस्या असो यावर रामबाण उपाय जर कोणी दिला असेल तर तो वृक्षांनीच म्हणूनच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणून संतानीही त्यांचे महात्म्य गायिले आहे.
कड्याकपारींवरून, उड्या मारत कधी संथपणे निसर्गाचा सहवास घेत जाणारी, काठावरील गावांना जीवन देणारी सरीता, जीवनातील प्रत्येक अवस्थाच आपल्या कृतीतून जणू सांगत असते. तिने चराचरावर केलेले उपकार विसरणे कदापि शक्य नाही. चांगल्या वाईटाचा स्वीकार करून चांगले तेवढे घ्यायचे ही वृत्ती आपण या सरितेकडूनच शिकायला हवी.
खंबीरपणे उभे राहून ऊन, वारा पाऊस यांचा मारा शांतपणे सहन करणारे पर्वत जीवनात दीपस्तंभाचे कार्य करतात; कारण मानवी जीवनात संघर्षरूपी ऊन, पाऊस, कधी निराशेचे काळे ढग येतात व माणूस खचून जातो त्यांनी पर्वताचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा.
निसर्गाचे हे मानवावर असणारे उपकार ज्योतीबा फुले व्यक्त करतात ते म्हणतात, “एक चंद्र नित्य भ्रमण करीतो ॥ सर्वा सुख देतो || निशीदिनी
सर्वांसाठी एक वायु केला खास ॥ घेती श्वासोच्छवास प्राणिमात्र.
हिमालयाची भव्यता व उत्तुंगता, सागराची अथांगता, आकाशाची विशालता, अग्नीची प्रखरता, चंद्राची शितलता, चांदण्यांचे सौंदर्य, वृक्षांची परोपकारिता, वाऱ्यांची प्रवाहिता या सर्वांच्या भव्यतेतून, दिव्यतेतून मानवाला आपला उदात्त असा जीवनमार्ग निवडायचा असतो. निसर्गाच्या या गुरूने खूप काही आम्हाला दिले आहे, देत आहे; पण आम्हा घेणाऱ्यांचे हात थिटे पडतात, मन दुबळे होते. शरीर विकलांग होते. निसर्गाकडून घेताना जर ते पवित्र मनाने, निसर्गाचा नाश होणार नाही ही काळजी घेऊन घेतले तरच ‘निसर्ग महान गुरू’ यातील महत्ता पटली असे म्हणावे लागेल.
“हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ अंग झाडतो, भिजला वारा, त्यात नवा दरवळ”

Leave a Reply