आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का ?

आपली मराठी ही आपली मातृभाषा भाषा आहे. आपण रोज जी भाषा बोलतो, जगतो त्या भाषेचा जन्म झाला संस्कृत भाषेच्या पोटी. अगदी पूर्वी ११ व्या शतकात मराठीतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ हा मुकुंदराजांनी लिहिला परंतु, त्यांनी त्यात मराठी भाषेला तुच्छ लेखले. त्याचवेळी महाराष्ट्रात महानुभाव पंथांची स्थापना झाली. ह्या पंथांचे आद्य प्रचारक श्री चक्रधरस्वामी यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला. आपल्या शिष्यांना त्यांनी दीक्षा दिली की, जर ग्रंथनिर्मिती करायची असेल तर ती इतर कोणत्याही भाषेत न करता फक्त मराठी भाषेतच करावी. तेव्हा मराठीचा अथीमान लोकांना वाटायला लागला. परंतु मराठी भाषेला मातृभाषा म्हणून महत्त्व दिले ते प्रामुख्याने, ज्ञानेश्वरांनी त्यांनी आपल्या मायबोलीचा महिमा गाताना म्हटले “माझ्या मराठीचा बोल कवतुके । परि अमृतातेही पैंजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।’ अशी अमृतातही पैंजा जिंकणारी आणि रसिकांना आवडणाऱ्या मराठी भाषेचा महिमा नंतर अनेकांनी गायला. या पवित्र भाषामंदीराचा पाया रचला ज्ञानेश्वरांनी.
एकनाथांनी गवळणी, भारूडे या स्वरूपात अक्षरवाङ्मयाची निर्मिती केली. रामदास- नामदेवांनी विचाररूपी अमृतदिले तर तुकारामांनी सुबोध अभंग लेखनाने या ज्ञानमंदीरावर कळसच चढविला. मोरोपंत वामनपंडित, रघुनाथ पंडित अशा अनेक पंडिती कवींनी विद्वत्ताप्रचूर काव्ये रचली. म्हणून मराठी भाषेचे वर्णन ‘संत पंत काव्याचा मधुर संगम’ असे केले जाते. तसेच पेशवेकाळात शाहीरांनी वीररसप्रधान पोवाडे आणि शृंगारिक लावण्यांचे लेणेही मराठी भाषेवर चढवले. केशवसुतांनी यापूर्वी अध्यात्माच्या साच्यात बंदिस्त असणाऱ्या भाषेला मुक्त केले. “ब्राह्मण नाही. हिंदूही नाही, न मी एक पंथाचा” अशा प्रकारचा मानवता धर्माचा पुरस्कार करणारा विचार मांडला. बालकवींनी निसर्गाची गाणी गायली. राम गणेश गडकरी यांनी प्रेमाची गाणी गायली, या प्रेमाला अत्र्यांनी विडंबनाची जोड दिली. तर माधव जूलियन यांनी आपल्या मराठी भाषेचा महिमा गाताना म्हटले, “मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू.” अशी उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आमच्या मराठी मायबोलीला निश्चितच कोणाचीतरी दृष्ट लागली. आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का ? हा प्रश्न मोहळाच्या माशीसारखा भणभण करू लागला. त्यामुळे आपण जरी ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ’ असे म्हणत असलो तरी इंग्रजीच्या हव्यासापोटी आपल्या मायबोलीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. ही खंत व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात, “परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका | भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे । गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका । आपण इंग्रजी भाषेचाच पाठपुरावा केल्याने मराठीमध्ये चांगली वाङ्मयनिर्मितीदेखील होत नाही. आपण मराठला दुय्यम मानून इंग्रजीकडे वळत असल्याने मराठीचा वाचकवर्ग कमी होत चालला आणि असेच होत राहिले तर मराठी भाषेचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. इंग्रजी भाषेचा अभ्यास जरूर करावा पण ती शिक्षणाचे माध्यम मात्र असू नये. पण हल्ली बरेचजण इंग्रजी शिक्षणाचे माध्यम मानतात. अगदी गरीब माणूस सुध्दा आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात टाकण्याचा हव्यासे धरतो आणि प्रत्येकजण आपलं जगणचं इंग्रजीमय करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच प्रश्न पडतो की, एवढी उज्ज्वल परंपरा असलेल्या मायबोलीचा आम्हांला अभिमान आहे का ?

Leave a Reply