पिंजऱ्यातील पोपट

स्वातंत्र्यापूर्वी भारतातल्या प्रत्येक नागरिकाने गुलामगिरीचं दुःख भोगल आहे, ते दुःख जेव्हा त्याला असह्य झालं तेव्हा त्यानं स्वातंत्र्याच्या होमकुंडात आपल्या जीवन सर्वस्वाच्या समीधा टाकल्या आणि शेवटी त्यांना स्वातंत्र्याचे मधुर फळ चाखायला मिळाले; पण माझ्या बाबतीत मात्र हा मनुष्य एवढा दृष्ट का? त्यानं मला या पिंजऱ्यात कुलुपबंद ठेवलं आहे. पारतंत्र्याच्या या दुःखाचे ओझे आता मलाही असह्य होत आहे. पण मी अगदी हवालदिल झालो आहे. स्वातंत्र्याचा रम्य काळ आठवणे, तेवढे माझ्या हातात आहे. मला आठवते, ती हिरवी हिरवी वनराई, तो जंगलचा मेवा आणि मुख्य म्हणजे आईवडिलांची प्रेमळ सावली हे सारं सारं मी फक्त रोज आठवत असतो. या साऱ्या सुखापासून मी दुरावलो. माझे स्वातंत्र्य हिरावल्या गेले. माझे मित्र, माझे नातेवाईक यांच्या आठवणी या भकास पिंजऱ्यात मी काढत असतो. हे जगाचा आता मला उबग आला आहे. ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे असे वाटणाऱ्या माणसाला जाब विचारावासा वाटतो ‘का रे बाबा । माझ्या जीवनात तुला कुठे आनंद दिसतो का ? मला आठवतो तो माझ्या जीवनातला काळा दिवस तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही एका हिरव्यागार झाडावर मी स्वच्छंदपणे फळांचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात खाली कधी नव्हे ते कणसाचे दाणे पेरले आहेत, असा भास झाला. मी लगेच माझ्या मित्रांना बोलावले आणि आम्ही सर्वच्या सर्व खाली उतरलो. उतरताना कणसाचे कोवळे दाणे खायला मिळणार म्हणून केवढा आनंद झाला, पण एका क्षणात तो मावळला. आम्ही सर्वजण अपंग झालो होतो. जाळे घेऊन सर्वच्या सर्व उडू म्हणून खूप ताकद एकवटली, पण व्यर्थ माणसांच्या दुष्टपणापुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आम्ही सर्व पारध्यांचे सेवक झालो होतो. त्याने आम्हाला शहरात विकले. एका श्रीमंत माणसाने मला विकत घेतले. पुन्हा माझी आणि माझ्या मित्रांची ताटातूट झाली. या सोन्याच्या पिंजऱ्यात माझ्या आवडीचे पदार्थ असतात; पण त्या पदार्थावर पारतंत्र्याचे सावट पसरले असल्याने पदार्थातील गोडवा मला विषाप्रमाणे वाटतो. बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे, वेली, पशू, पाखरे, यांशी गोष्ट करु, या गुलामगिरीचा शेवट माझ्या शेवटानेच होईल असेच मला वाटू लागले आहे. तरीपण एका आशेवर मी जगतो आहे की माझ्या मालकीतील माणुसकी जागी होईल आणि माझे स्वातंत्र्य मला पुन्हा मिळेल.

Leave a Reply